मंडळाची माहिती

सन १९५६ सालचा कृष्णधवल काळ त्या काळातली ब्लैक-व्हाईट ची ती दुनिया आमच्या काळाचौकी विभागाला रंगबिरंगी, अध्यात्मिक, भक्तिमय आणि सुंगधीत करून गेली ती महागणपतीच्या प्रतिष्ठापनेने. आज मंडळात वावरणाऱ्या असंख्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जन्मही तेव्हा झाला नव्हता परंतु तत्कालीन काळात रोवलेल्या त्या बिजाचे संवर्धन, जोपासना मंडळातली काही ज्येष्ठ मंडळी आजतागायत करत आहेत. मंडळाच्या स्थापनेसाठी संस्थापकीय अग्रणी दिवंगत कार्यकर्ते होते कै. श्री. रघुराम व्ही. शेट्टी, टि व्ही. सावंत, श्रीपत बाईंग, श्रीधर लाड, कै. डी. आर. चव्हाण, चिंतामण परब, जनार्दन केरकर, नाना पवार, साटम गुरुजी, पांडुरंग दळवी, रामचंद्र शेठ, बस्नाक शेठ, चंद्रोजी चिले, बाबा जेतपाल, रघुनाथ दळवी, डी. बी. सोनावणे, सखाराम माने, सहदेव नरसाळे, केशवराव खांडेकर, गजानन गावडे, विठ्ठल शेलार आणि राजाराम आकेरकर भाऊसाहेब आंग्रे, मंडळातील कार्यरत असणारे पदाधिकारी कार्यकर्ते.

आज ज्या दिग्विजय मिल चाळीच्या वास्तुत महागणपती स्थानापन्न होतो त्याच वास्तूत सुरुवातीच्या काळात छोटासा मंडप उभारुन श्रीं ची छोटी ३ ते ४ फुटांची मुर्ती आणून उत्सव साजरा करण्यात येत असे. आर्थिक मिळकतीची आोढाताण असताना हि जिद्द आणिा चिकाटीच्या बळावर मंडळातील जुने-जाणते कार्यकर्ते तन-मन-धन अर्पुन काम करायचे. विभागातीलच एक कबड्डी संस्था, "संयुक्त काळाचौकी सेवा मंडळ" या मंडळाचे त्या काळातील (१९५६ ते १९६६ च्या दशकातील ) तरुण कार्यकर्ते मंडळात उत्साहाने सहभागी होउन कार्यरत होते. मंडळाच्या पुर्ण व्यवस्थापनाचा कार्यभारच त्यांनी योग्य रीतीने हाताळला. या संस्थेच्या सहकार्याने मंडळ कला, क्रिडा, स‌ांस्कृतीक अशा प्रत्येक कार्यात एक एक यशस्वी पायरी पार करु लागले. संपुर्ण काळाचौकी विभागाचा हा उत्सव डॅा. आंबेडकर मार्ग लालबाग येथील के.टी. कुबल ते द.ला. मार्ग पोलिस वसाहत इथपर्यंत विस्तारलेला. संपुर्ण विभागाची वर्गणी जमा करणे, कार्यक्रमाची आखणी करणे वगैरे कामात संपुर्ण विभागातुन त्या वेळचे तरुण कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने उत्सवामध्ये सामिल होऊ लागले. कै. विठ्ठल राऊत, महादेव शिंदे, चिंतामण परब, भास्कर भोसले, मनोहर जगताप, शिवराम राणे, सिताराम चिले, पुंडलिक पडवळ, पुंडलिक आंग्रे, पोळेकर मास्तर, बाबा राऊत, नामदेव मोरे, श्री. जया शेट्टी, श्री. बाळा राणे, श्री. प्रकाश राणे, श्री. चिंतामण सावंत यांच्या सारख्या होतकरु कार्यकर्त्यांमुळे मंडळ यशस्वीरीत्या भरारी घेऊ लागले. मंडळाचा रोप्य महोत्सव ही धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. दिव्यांच्या रोषणाइने संपुर्ण विभाग प्रकाशमय करण्यात आला होता. विविध प्रकारच्या स्पर्धांनी मंडळाने आपले स्वतःचे वेगळे अस्तित्वच विभागात निर्माण केले होते.

१९७५-८५ च्या दशकात छोटेखानी मंडपाचा आकार विस्तारु लागला. संपुर्ण दिग्विजय मिल चाळीच्या पटांगणात भव्य दिव्य मंडप उभारण्यात आला. कार्यकर्त्यांच्या श्रमामुळेच मंडळाचे स्वरुप विस्तारु लागले. मंडळाच्या कार्याच्या कक्षा रुंदावल्या. तेव्हा पासूनच मंडळामध्ये विभागीय महिलांनी उत्स्फुर्तपणे भाग घेतला. श्रीच्या मंडपात महिलांचे हळदी कुंकू समारंभ तसेच विविध स्पर्धांची रेलचेल सुरु झाली. संपूर्ण विभागातून महिलांना एकत्र करण्यासाठी त्यावेळी सौ शांताबाई आंग्रे, श्रीम. शोभना मोरे, सौ साधना चव्हाण, कै. नीला सावंत, सुलोचना नरसाळे, सुलोचना जगताप, रुक्मिणी दळवी, स्नेहलता माने तसेच श्रींम. शालिनी केरकर, सुनिता सावंत, निता पाथरे अश्या असंख्य महिलांनी एकत्र येउन महिला मंडळ कार्यरत केले. मंडळातर्फे विभागस्तरीय कार्यक्रम किंवा स्पर्धा न घेता मुंबई स्तरीय किंवा राज्य पातळीवर मंडळ कार्यक्रम आणि स्पर्धा घेवु लागले.विशेष महत्वाची बाब म्हणजे मंडळाने सतत १२ वर्षे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा. मंडळाच्या कलासेवेतील एक व्रताचे तप मंडळाने मोठ्या कौशल्याने पार केले. जसजसे एक एक वर्षे पुढे जात होते तसतसा मंडळाचा लौकिक दृष्टलागण्याजोगा होत होता. नवनव्या कार्यकर्त्यांचा, पदाधिका-यांचा आोघ मंडळात सातत्यपुर्वक येत होता. हातास हात गुंफले आणि मेहनतिच्या बळावर मंडळाने एक धाडसी साहस पुर्ण केले. काळाचौकी विभाग मंडळासाठी कार्यालय घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी जिवतोड मेहनत घेतली. देणग्या गोळा केल्या, लॅाटरीतून बक्षिसे देण्याचा उपक्रम केला. अशा रीतीने धनसंचय गोळा करुन शेवटी हट्टाने स्वप्न पुर्ण केले. म्हणूनच कार्यालयाचे नाव स्वप्नपुर्ती ठेवण्यात आले.

प्रत्येक वर्षातला श्री महागणपतीचा उत्सव विभागातील वर्गणीदार, देणगीदार, जाहिरातदार आपल्या घरातल्या उत्सवा सारखाच साजरा करत होते. मंडळाचा सुवर्ण महोत्सवी गणेशोत्सव सोहळा सन २००५ साली डामडौलात पार पडला. ५० फुट खोल गुंफा तयार करुन महागणपतीचे तेजोमय रुप भाविकांना आशिर्वाद देत उभे आहे असा नयनरम्य मनोहरी देखावा मंडळातर्फे भाविक, भक्तगणांसाठी साकारण्यात आला होता. ह्या वर्षी मंडळाने मोठ्या दिमाखात हिरक महोत्सवात पदार्पण केले आहे. आज मंडळाची ज्येष्ठता, श्रेष्ठता एका वटवृक्षासारखी सामाजिक सेवेने बहरत आहे. ६० वर्षांच्या काळात मंडळाशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक सभासद, कार्यकर्ता, पदाधिकारी हा फक्त मंडळाच्या सामाजिक, अध्यात्मिक तत्वांशीच जोडला गेला म्हणूनच उच्च-निच, श्रीमंत-गरीब, सत्तावान-सत्ताहीन असा भेद मंडळामध्ये कधीही राहिला नाही. सर्वांनी एकत्र येवूनच सांघिक शक्तीने हि यशस्वी वाटचाल केली म्हणून आज हिरक महोत्सवाकडून अमृत महोत्सवाकडे मंडळ गरुड भरारी घेत आहे. विभागाच्या सांघिक, एकत्रितपणाच्या शक्तीतच मंडळाप्रती आत्मीयता दिसून येत आहे. त्यामुळेच भेदरहित, एकाच विचाराने, समदृष्टीने, सात्विकवृत्तीने, श्रीं चरणी सर्वच जण आपली सेवा अंतकरणपूर्वक करीत आहे. निष्काम कर्म आचरण्यासाठी सातत्य चिकाटी हवी, मंडळाप्रती प्रत्येकाकडे निष्ठा आहेच. त्याच गुणांचा संगम मंडळातल्या कार्यकर्ता ह्या पदामध्ये दिसत आहे. त्या पदावरूनच कार्यकर्ते मार्गस्थ झाले, होत आहेत आणि ह्यापुढे हि होत राहतील .